बुधवार, २९ मे, २०१९

फडणविसांचे यशवंतराव

            महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे सरकार आले .त्यावेळी भाजपचे पहिले मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील समाधी स्थळावरती श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी नवीन सरकार कोणत्या पद्धतीने काम करेल याचा संकेत दिला होता . महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचाराने ,त्यांनी दाखवलेल्या मार्गाने हे सरकार काम करेल आणि यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवू.असे काहीसे थोडक्यात आपले मनोगत मा.फडणवीस साहेबांनी व्यक्त केले होते. भाजपच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्याने कॉंग्रेसच्या स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवू असे म्हणल्यामुळे मा.फडणवीस यांचे वरती कॉंग्रेस ,राष्ट्रवादी पक्षातून बरीच टीका करण्यात आली तसेच तथाकथित पुरोगामी विचारवंतांकडून सुध्दा बोचरी टीका करण्यात आली . ‘स्व.यशवंतराव हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी जातीयवादी संघटनांना कायम विरोध केला आहे. भाजपा पक्षाजवळ कोणतेही नाव घेण्यासारखे नेते नाहीत म्हणून ते कॉंग्रेस नेते असलेले स्व.यशवंतराव यांचा वापर करत आहेत .मोदींनी पटेल तर फडणविसांनी यशवंतराव चव्हाण यांना पळवण्याचा प्रयत्न केला आहे .’ – असे आरोप करण्यात आले .
         परंतु मा.फडणवीसांच्या वक्तव्याचा खोलवर जाऊन कोणी विचार केलेला दिसत नाही. स्व.यशवंतराव यांचे पक्षासाठीचे कार्य जर कोणी अभ्यासले असेल तर त्याला मा.फडणविसांचे धोरण लक्षात येईल . स्व.चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाला भविष्यात प्रबळ विरोधक निर्माण होऊ नये यासाठी तसेच विरोधी पक्ष कमकुवत करण्यसाठी त्यांच्यातील तरुण नेतृत्व स्वपक्षात घेतलेले आहेत . उदाहरणच पाहायचे असेल तर सर्वात मोठे उदाहरण मा.शरद पवारांचे घेता येईल . मा.शरद पवार हे विद्यार्थी युनियनचे नेते होते ,त्यांना कॉंग्रेस पक्षात घेऊन युवक कॉंग्रेस अध्यक्ष , आमदार ,मंत्री करण्यात आले . पुढे तर शरद पवार हे यशवंतरावांचे राजकीय वारस आहेत असे गृहीत धरले गेले आहे . दुसरे उदाहरण भाऊसाहेब थोरात (कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वडील) यांचे पाहता येईल . भाऊसाहेब थोरात हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते . त्यांनाही कॉंग्रेस पक्षात सामाऊन घेण्यात आले . अशी बरीच उदाहरण आपणाला पाहता येतील . ६० – ७० च्या दशकात  विरोधी पक्षातील तरुण नेतृत्व स्वपक्षात घेतल्याने शेतकरी कामगार पक्ष ,कम्युनिस्ट हे आज बियाणाला सुध्दा शिल्लक राहिला नाही हे आपण आपल्याच डोळ्यांनी पाहत आहोत .
          यापेक्षा मा.फडणवीस हे वेगळे काय करत आहेत ? कॉंग्रेस –राष्ट्रवादी मधील तरुण नेतृत्वाला भाजपचे दार सताड उघडे ठेवले नाहीत काय ? नगर मधील कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते श्री.राधाकृष्ण विखे पाटीलांचे चिरंजीव श्री.सुजय विखे पाटील , सोलापूरचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटीलांचे चिरंजीव श्री.रणजितसिंह मोहिते पाटील , फलटणचे निंबाळकर घराण्यातील कॉंग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे सांगलीतील कॉंग्रेसचे नेते स्व.संपतराव देशमुख यांचे चिरंजीव मा.संग्रामसिंह देशमुख यांना भाजपात आणून पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला भविष्यकालीन नेतृत्वहीन करून टाकल्यात जमा आहे . उर्वरित महाराष्ट्राची यापेक्षा वेगळी कथा नाही.
           एकंदरीत शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे . म्हणजेच यशवंतरावांच्या विचाराने त्यांच्या स्वप्नातील महारष्ट्र घडवण्याचा यशस्वी प्रयत्न मा.फडणवीसांनी केलेला असला तरी भाजपाचा विस्तार सुध्दा यशवंतरावांच्याच विचाराने केला जातोय हेच या चार – साडेचार वर्षातून दिसून येतोय. विषय फक्त या कॉंग्रेस विचारसरणीतील तरुण नेत्यांना संघीय ढाच्यात कसे बसवणार याचा आहे . 
        

६ टिप्पण्या: